राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सोयरीक करून शिवसेनेने सत्तास्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर आता औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता शिवसेनेचा कस लागणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे विधानसभेचे सहा आमदार तर विधान परिषदेचा एक असे 7 आमदार आहेत. या सर्व आमदारांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारावी, असे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहे. एका आमदाराकडे 12 ते 15 वॉर्डाची जबाबदारी देण्यात आली आहे. या वॉर्डातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे काम या आमदारांवर सोपविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांचे औरंगाबादवर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच स्वतः ठाकरे यांनीच मनपा निवडणुकीत लक्ष घातल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातील या सातही आमदारांना मातोश्रीवरून स्पष्ट आदेश मिळाले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेत पक्षाला एक हाती सत्ता मिळवून देण्यासाठी आमदारांनी जिवाचे रान करावे, असे बजावण्यात आले आहे. दरम्यान आपले राजकीय भविष्य सुरक्षित करायचे असेल तर महानगरपालिकेत यशाचा रेशो या आमदारांना वाढवावा लागणार आहे. यापुढे मातोश्रीवर येताना पक्ष संघटनेतील यशाची पावती सोबत आणावी लागणार, असेही स्पष्ट बजावण्यात आले आहे. आता खुद्द पक्षप्रमुख यशाचा आलेख तपासणार असल्याने शिवसेनेचे आमदार चांगले सतर्क झाल्याचे समजते.
















